१९३६ साली प्रदर्शित झालेल्या मॉडर्न टाईम्स या सिनेमात आपल्या कामाच्या वेळी चार्ली चाप्लीन काही सेकंदासाठी स्वच्छतागृहात गेला असताना तेथील खिडकीवर साहेबाचे चलतचित्र येत तो चार्लीवर ओरडतो आणि कामावर परत जाण्यास सांगतो असे दृश्य आहे. त्याचप्रमाणे ई संकेतस्थळावर वस्तुची मागणी करण्यात आल्यानंतर ती कमीत कमी वेळेत आपल्यापर्यंत पोहोचावी अशी आपली इच्छा असते. मात्र ती वस्तू दुसऱ्या शहरातून आणण्यासाठी किती कष्ट आणि नियोजन लागते त्याचा आपण कधीही विचार करत नाही. तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सहजसोपे झाल्याचे सांगण्यात येते, मात्र पडद्याआड काही लोकांचे वास्तव भयावह आहे.
सद्या तंत्रज्ञानामुळे सर्वांवर नजर ठेवणे शक्य झालेय. कर्मचाऱ्यांच्या कामावर वरिष्ठांचे लक्ष असते, तसेच ते कसे काम करतात याची देखरेख करण्यात येते. आपल्यावर साहेबाचे लक्ष असल्याने कामचुकारपणा कमी झालाय आणि त्यामुळे लोकांच्या कामात बदल होत आहेत. सध्या अशाच प्रकारे अमेरिकेतील ट्रक चालकांवर नजर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेतील ट्रक हे आपल्या भारतातील ट्रकपेक्षा दिसायला मोठे आणि आकर्षक असतात. अनेक ट्रकचालकांसाठी हे एका घराप्रमाणेच असते. यामध्ये त्यांना आठवडाभर पुरेल एवढा खाण्याचा साठा आणि त्याचबरोबर कुत्रेही असतात. मनोरंजन आणि आराम करण्याचीही सोय त्यात असते. अनेकवेळा आठवडाभर काम केल्याने कामाच्या तणावाने अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे अमेरिकेतील ट्रक चालकांवर सर्वाधिक नजर ठेवण्यात येणार आहे. सध्या त्या देशातील ३५ लाख ट्रक चालकांना कायद्यानुसार ११ तासापेक्षा जास्त काम करता येत नाही. मात्र चालकांवर त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे, असा कायदा ११ डिसेंबरपासून लागू करण्यात येत आहे. यासाठी अमेरिकेतील प्रत्येक ट्रकमध्ये १८ डिसेंबरपासून जीपीएस असणारे इलेक्ट्रॉनिक लॉगिंग डिवाईसेस (ईएलडी) वापरण्याची सक्ती करण्यात येणार आहे. सध्या चालकांकडे किती वेळ काम करण्यात आले याची नोंद ठेवण्यासाठी नोंदवहीची सोय असते, मात्र त्यात अनेकदा फेरफार करण्यात येतात. डिसेंबरपर्यंत मुदत दिल्याने ट्रकचालक देशव्यापी संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. आपल्या रोजगारावर घाला घालण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप आहे. अगोदरच हा कायदा दोन वर्षे लटकलेला आहे.
या नव्या आधुनिक उपकरणामुळे चालकाने किती तास काम केले आणि या कालावधीत त्यांनी किती अंतर हाकले, ट्रक चालविण्याचा वेग काय आहे याची माहिती त्याच्या कंपनीच्या मालकाला तत्काळ मिळणार आहे. वाहतूक क्षेत्राच्या इतिहासात अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर कधीही झाला नव्हता. चालकांनी किती तास काम करावे आणि आराम करावा यासाठी १९३८ पासून कायदा करण्यात आला आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार चालक ११ तास गाडी चालवू शकतो आणि या कालावधीत त्याला १३ मिनिटांची विश्रांती घेता येते. यानंतर त्याला ३ तासांचे नॉन ड्रायविंग काम करता येते. पुन्हा गाडी चालविण्यासाठी १० तास सक्तीने झोप घेण्याचा नियम आहे. नोंदवहीवर चुकीची माहिती देता येते, मात्र तंत्रज्ञानापुढे किती तास काम केले हे लपविता येत नाही. सध्या नियम तोडणे शक्य आहे, मात्र ईएलडीने कामाचे तास मोजले जातील. अमेरिकेत तासावरून वेतन देण्यात येते. कमीत कमी वेळेत जास्त अंतर पार केल्यास पगारही जास्त मिळतो. त्यामुळे आपल्याला मिळणारे पैसे कमी होत कोणाचेही नियंत्रण चालकांना नको आहे. ईएलडीचा वापर करण्यात आल्याने अपघातांची संख्या कमी झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.
तंत्रज्ञानाला मानवी भावना ओळखता येत नाहीत. एखाद्या चालकाला आपल्या घरी जायचे असेल आणि अंतर केवळ २० किमी असताना कामाचे ११ तास अगोदरच भरल्यास त्याला पुढील प्रवास करण्यासाठी १० तास वाट पहावी लागणार आहे.
ईएलडी बंधनकारक करण्याला न्यायालयात आव्हान देण्यात आहे होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करण्यास नकार दिला होता. ईएलडीचा वापर करण्यास अमेरिकन ट्रकिंग असोसिएशनने सहमती दर्शविली आहे.
यापूर्वी फेब्रुवारी १९८३ मध्ये ट्रक चालकांनी देशव्यापी संप पुकारला होता. इंधन आणि चालकांच्या फीमध्ये वाढ करण्यात आल्याने संप पुकारला होता. फेब्रुवारी १९७४ मध्ये पुकारण्यात आलेला संप ११ दिवस चालला होता. इंधनाच्या दरात वाढ केल्याने केलेल्या संपाला हिंसक वळण लागत ११ जणांचा मृत्यू झाला होता.
कोणत्याही चालकाला अपघात करून दुसऱ्याचे प्राण घ्यावयाचे नसतात. आपल्यावर कोणाचेही नियंत्रण नसताना काम करायला अधिक आवडेल असे या स्वातंत्र्यप्रिय देशातील चालकांचे म्हणणे आहे.
Advertisements Share this: